उत्तर प्रदेश:- नात्यांना काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मोबाईल फोनवरून झालेल्या वादातून एका पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह घराच्या मागील मोकळ्या जागेत सहा फूट खोल खड्डा खोदून पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल चार दिवसांनी हा गुन्हा उघडकीस आला.
ही घटना बेलघाट पोलीस ठाणे क्षेत्रातील बेइलीकुंड गावातील आहे. अर्जुन (वय 26) याचा दोन वर्षांपूर्वी खुशबू (वय 26) हिच्याशी विवाह झाला होता. अर्जुन लुधियानामध्ये मजुरीचे काम करत होता आणि काही दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता. 21 डिसेंबरच्या रात्री अर्जुन आणि खुशबू घरी एकटे असताना खुशबू मोबाईलवरून दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याचा संशय अर्जुनला आला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर अर्जुनने खुशबूचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर त्याने घराच्या मागील रिकाम्या जागेत खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरला. त्यानंतर खुशबू कुणालाही न सांगता निघून गेल्याचे खोटे कारण अर्जुनने कुटुंबीय व शेजाऱ्यांना सांगितले.
चार-पाच दिवस उलटूनही खुशबूचा काहीच पत्ता न लागल्याने अर्जुनचे वडील श्याम नारायण यांना संशय आला. त्यांनी थेट बेलघाट पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी अर्जुनला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कधी पत्नीने आत्महत्या केल्याचा दावा, तर कधी मृतदेह नदीत फेकल्याचे सांगत तो पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. मात्र अखेर त्याने हत्या करून मृतदेह पुरल्याची कबुली दिली.
आरोपीच्या सांगण्यानुसार पोलिसांनी घरामागील जागेचे उत्खनन केले असता तिथेच खुशबूचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अवैध संबंधांच्या संशयातून व मोबाईल फोनवरून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.