आरोग्य

गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; कोल्हापुरात मोफत आरोग्य शिबिरे

shrigansha arogyacha campaign kolhapur health camps ganeshotsav


By Shivani - 12/9/2026 1:59:14 PM
Share This News:



गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान; कोल्हापुरात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान आरोग्य शिबिरे

कोल्हापूर :

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यभरात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय मुंबई अंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

कोणत्या आरोग्य सुविधा मिळणार?

या समुदाय आरोग्य शिबिरांमध्ये नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी, आवश्यक रक्त चाचण्या, ईसीजी तपासणी, इतर अनुषंगिक व उपचारात्मक तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शिबिरे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय आयुक्त, नगरपालिका प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांच्या समन्वयकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शासकीय-खासगी संस्थांचे सहकार्य

जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था तसेच शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या सहकार्याने ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. शिबिरांसाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी, निदानात्मक साधने आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या उत्साहासोबतच त्यांच्या आरोग्यालाही प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 


Kolhapur News: गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान; १४ ते २५ सप्टेंबर आरोग्य शिबिरे
Total Views: 21