मनोरंजन
सिद्धार्थ जाधवच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल; अभिनेता संतापला, म्हणाला ‘मी पूर्णपणे बरा आहे’
By Shivani - 8/25/2026 12:53:30 PM
Share This News:
सिद्धार्थ जाधव यांच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल; अभिनेता संतापला, म्हणाला ‘मी पूर्णपणे बरा आहे’
मुंबई :
मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर खोटी बातमी व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. स्वतःच्याच मृत्यूची बातमी पाहिल्यानंतर सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या प्रकारावर संताप व्यक्त केला. तसेच चाहत्यांनी आणि मित्रमंडळींनी काळजीपोटी केलेल्या कॉल आणि मेसेजसाठी त्याने आभार मानले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका युट्यूब व्हिडिओमध्ये ‘अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज, गंभीर आजार’ अशा आशयाची बातमी दाखवण्यात आली होती. ही बातमी सिद्धार्थच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने संबंधित व्हिडिओ शेअर करत आपण पूर्णपणे ठीक असल्याचे स्पष्ट केले.
सिद्धार्थ जाधवने व्हिडिओमध्ये बातमी पाहून हसत ‘मी ठीक आहे’ असे सांगितले. त्यानंतर त्याने या चुकीच्या बातमीवरून संबंधितांना चांगलेच सुनावले. त्याने सांगितले की, त्याचे ‘अनिमल’चे प्रयोग आणि ‘धिंगाणा’चे शूटिंग सुरू आहे.
चुकीच्या बातमीमुळे काळजी व्यक्त करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानताना सिद्धार्थ म्हणाला की, “ज्या-ज्या लोकांनी मला काळजीने मेसेज आणि कॉल केले, त्यांचे मनापासून आभार.” मात्र, बातमी प्रकाशित करण्यापूर्वी किमान एकदा आपल्याला विचारायला हवे होते, असेही त्याने सुनावले.
“बातमीदारानं एकदा मला तरी विचारायचं. एवढी कसली घाई आहे तुम्हाला? ज्याने ही हेडलाईन केली त्याला तर नोबेल दिला पाहिजे. माझा फोटो तरी बघायचा,” अशा शब्दांत सिद्धार्थने या प्रकाराची खिल्ली उडवत संताप व्यक्त केला.
दरम्यान, या घटनेनंतर सिद्धार्थ जाधवचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याने या निमित्ताने आपल्या आगामी कामाचे प्रमोशनही केले. “मी निदान माझ्या नाटकाचं तरी प्रमोशन करतोय. अनिमल पहायला या दादरला,” असे म्हणत त्याने चाहत्यांना नाटक पाहण्याचे आवाहन केले.
Siddharth Jadhav Fake Death Rumour: अभिनेता सिद्धार्थ जाधवने दिलं स्पष्टीकरण
|