राजकीय
जनतेची दिशाभूल करून स्मार्ट मिटर बसवणे बंद करा -शिवसेना उबाठाचे आजरा वीज वितरण शाखेला निवेदन
By nisha patil - 11/10/2025 11:58:32 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- सद्या स्मार्ट मिटरचे भूत गावगावी आणि गल्लोगल्ली फिरत आहे. नागरिकांमध्ये या स्मार्टमीटर विषयी अजूनही संभ्रम आहे. काहीजण हे स्मार्टमीटर बसवून घेतले आहेत तर काहीजण या स्मार्ट मीटरला विरोध केल्याने त्या जागी अजून पूर्वीचेच वीजमिटर आहेत.लोकांची दिशाभूल करून महावितरण कंपनी स्मार्ट मीटर बसवीत असल्याचा आरोप करीत जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविणे बंद करा नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देत शिवसेना उबाठाने महावितरणला निवेदन दिले आहे.
आजरा तालुक्यामध्ये वीज कंपनीकडून गावोगावी तसेच आजरा शहरातून काही ठिकाणी जाऊन कंपनीचे कर्मचारी भागातील नागरिकांना चुकीची माहिती देऊन कोणत्याही नागरिकांना पूर्व सूचना न देता घराघरात स्मार्ट मीटर बसवत आहेत.त्याचबरोबर स्मार्ट मीटर बसवले तर बिल कमी येणार, आता बसवून घेतले नाही तर पुन्हा पैसे भरून हे मीटर बसवून घ्यावे लागणार अशी भीती घालून तसेच चुकीची माहिती देऊन सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून स्मार्ट मीटर बसवत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. सदरचे प्रकार तातडीने थांबवण्यात यावेत, न थांबवलेस शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
*परंतु ज्यांचे मीटर बदललेले आहेत याबाबत भूमिका काय असणार? याबाबतही ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे तसेच जर यात काही दोष नसेल तर याबाबत वीज अधिकाऱ्यांनीही आपली ठोस भूमिका मांडावी आणि संभ्रम दूर करावेत असे मीटर बदललेल्या ग्राहकांचे म्हणणे आहे.
यावेळी संभाजी पाटील (उपजिल्हा प्रमुख), युवराज पोवार (तालुकाध्यक्ष), हरिभाऊ कांबळे (साखर कारखाना संचालक), महेश पाटील, ओंकार मद्याळकर, दिनेश कांबळे, संजय येसादे, सुयश पाटील, अमित गुरव, रोहन गिरी, बिलाल लतीफ, सागर नाईक, हरिश्चंद्र व्हरकटे, रवी यादव, सुरेश होडगे आदिजण उपस्थित होते.
जनतेची दिशाभूल करून स्मार्ट मिटर बसवणे बंद करा -शिवसेना उबाठाचे आजरा वीज वितरण शाखेला निवेदन
|