विशेष बातम्या
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गोकुळचा मदतीचा हात
By nisha patil - 9/27/2025 11:21:41 AM
Share This News:
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक गावे महापुराच्या पाण्याखाली गेली आहेत. पशुधन, घरे, दुकाने, फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील कंदलगाव गायकवाड वस्ती, मनगोळी, माने वस्ती, गावडेवाडी, होनमुर्गी, वांगी, वडकबाळ, तेरेमैल, डोणगाव, तेलगाव तिरे, पाथरी आणि शिवनी या गावांतील पूरपीडितांना गोकुळकडून ६,४०० अर्धा-लिटरच्या पिशव्यांमध्ये दूध वाटप करण्यात आले. एकूण ३२०० लिटर दूध नागरिकांना मोफत देण्यात आले.
लहान बाळे, वयोवृद्ध आणि दैनंदिन चहा-पाण्यासाठी दूध आवश्यक असताना महापुरामुळे झालेल्या दुग्धटंचाईत गोकुळचा हा उपक्रम पूरग्रस्तांसाठी दिलासा ठरला. नागरिकांनी या मदतीबद्दल गोकुळचे आभार मानले.
दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अभिजीत नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत वाटप पार पडले. या वेळी ब्रह्मदेव माने शिक्षण संकुलाचे संचालक पृथ्वीराज माने, तिरे गावचे गोवर्धन जगताप, रामकाका जाधव, सरपंच संजय गायकवाड, उपसरपंच मधुकर कांबळे, प्रगतशील शेतकरी हरिदास जमादार, विठ्ठल घंटे, बालाजी घंटे, प्रशासकीय अधिकारी नासिर पठाण, तलाठी श्री. कोकरे, पुरवठा अधिकारी निखिल महानोर, सोलापूर गोकुळ डिस्ट्रीब्यूटर रवी मोहिते, संग्राम सुरवसे, मोहन चोपडे, निलांजन चेळेकर तसेच पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.
“गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे,” असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गोकुळचा मदतीचा हात
|