कृषी

ऊसाला ५ हजारांचा दर द्या; आंदोलन अंकुशचा कारखानदारांना इशारा

sugarcane rate 5000 andolan ankush shirol


By Shivani - 12/9/2026 1:50:27 PM
Share This News:



ऊसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या, अन्यथा बांधावरच ऊस रोखू; आंदोलन अंकुशचा इशारा

शिरोळमध्ये ऊसदर आंदोलनाची रणनीती ठरली; गतहंगामातील तुटलेल्या उसासाठी ३०० रुपये अतिरिक्त देण्याचीही मागणी

शिरोळ | प्रतिनिधी आचिन हेरवाडे :

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या यंदाच्या ऊसदराच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. यंदाच्या उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर जाहीर करावा; अन्यथा ऊस बांधावरच रोखून धरू, असा आक्रमक इशारा ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी कारखानदारांना दिला आहे. शिरोळ तालुक्यात ‘आंदोलन अंकुश’च्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत यंदाच्या ऊसदर आंदोलनाची दिशा आणि रणनीती निश्चित करण्यात आली.

उसाचा वाढता उत्पादन खर्च, मजुरी, खते, औषधे, पाणी आणि वाहतूक यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे साखर तसेच उपपदार्थांना चांगले दर मिळत असून कारखान्यांच्या नफ्यात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा प्रतिटन ५ हजार रुपयांचा दर देणे शक्य आहे, अशी भूमिका धनाजी चुडमुंगे यांनी मांडली.

दर जाहीर होईपर्यंत ऊस तोडणीची घाई नको

ऊसदर जाहीर होईपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी घाई करू नये, असे आवाहनही ‘आंदोलन अंकुश’कडून करण्यात आले. शेतकऱ्यांच्या घामातून ऊस पिकतो, मग साखर उद्योगाच्या नफ्यात शेतकऱ्यांचा योग्य वाटा का नाही?, असा सवाल करत आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा देण्यात आला.

गतहंगामातील उसासाठी ३०० रुपयांची मागणी

यंदाच्या ५ हजार रुपये दरासोबतच गतहंगामातील साखर आणि उपपदार्थांच्या नफ्यात शेतकऱ्यांचा वाटा म्हणून तुटलेल्या उसाला प्रतिटन आणखी ३०० रुपये द्यावेत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. या मागणीच्या ठरावाला उपस्थित शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी हात उंचावून एकमताने मंजुरी दिली.

५ हजारांच्या दरासाठी मोठ्या आंदोलनाचा निर्धार

गतवर्षीच्या आंदोलनामुळे एफआरपीपेक्षा अधिक दर मिळवण्यात यश आले होते. यंदा त्यापेक्षा मोठी लढाई उभी करून प्रतिटन ५ हजार रुपयांचा ऊसदर पदरात पाडून घेण्याचा निर्धार ‘आंदोलन अंकुश’ने केला आहे. दर जाहीर न झाल्यास ऊस तोडणी रोखण्यापासून ते ऊस बांधावरच अडवण्यापर्यंत आंदोलन तीव्र करू, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे.


ऊसाला ५ हजारांचा दर द्या; आंदोलन अंकुशचा कारखानदारांना इशारा
Total Views: 15