राजकीय
सुरेश चौगुले जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदाच्या शर्यतीत आघाडीवर
By Administrator - 11/26/2026 5:01:59 PM
Share This News:
जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदासाठी सुरेश चौगुले यांचे नाव आघाडीवर; राष्ट्रवादीत जोरदार चर्चा
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी राधानगरी तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश द. चौगुले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर त्यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नरतवडे येथील रहिवासी असलेले सुरेश चौगुले हे शिवतेज प्रसारक मंडळ आणि दत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यासह राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादीची संघटना मजबूत करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता. मात्र, पक्षनिष्ठा, जनसंपर्क आणि संघटनात्मक कामाची दखल घेऊन त्यांना स्वीकृत सदस्यपदाची संधी दिली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चौगुले यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून अंतिम निर्णय होणार का, याकडे राधानगरी तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
सुरेश चौगुले जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदाच्या शर्यतीत आघाडीवर
|