मनोरंजन
तुकाराम मुंढेंच्या बायोपिकची चर्चा; के.के. मेनन की अक्षय कुमार? नेटकऱ्यांची पसंती कोणाला?
By Shivani - 8/22/2026 4:58:43 PM
Share This News:
तुकाराम मुंढेंच्या बायोपिकची सोशल मीडियावर चर्चा; के.के. मेनन की अक्षय कुमार? नेटकऱ्यांची पसंती कोणाला?
मुंबई :
आपल्या कडक शिस्तीच्या आणि स्पष्ट कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाची (FDA) जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवायांमुळे त्यांची चर्चा होत आहे. याचदरम्यान, त्यांच्या जीवनावर बायोपिक तयार झाल्यास त्यांची भूमिका कोणता अभिनेता साकारू शकतो, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे आणि कधी-कधी वादग्रस्त निर्णय झाले आहेत. त्यांच्या कडक शिस्तीची, कामाच्या वेगळ्या पद्धतीची आणि प्रशासनातील सक्रियतेची नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळे त्यांच्या जीवनावर चित्रपट तयार व्हावा, अशी इच्छा काही नेटकऱ्यांनी सोशल मीडिया पोस्ट आणि कमेंट्समधून व्यक्त केली आहे.
के.के. मेननच्या नावाची सर्वाधिक चर्चा
संभाव्य बायोपिकमध्ये तुकाराम मुंढे यांची भूमिका कोण साकारू शकतो, याबाबत नेटकऱ्यांनी विविध कलाकारांची नावे सुचवली आहेत. यामध्ये अभिनेता के.के. मेनन यांचे नाव विशेष चर्चेत आहे.
तुकाराम मुंढे यांची शांत, गंभीर आणि संयमी व्यक्तिमत्त्वाची छबी पाहता के.के. मेनन ही भूमिका प्रभावीपणे साकारू शकतात, असे अनेकांचे मत आहे. सोशल मीडियावर काही युझर्सनी के.के. मेनन यांचा तुकाराम मुंढे यांच्या लूकमधील AI फोटो तयार करून शेअर केला आहे.
एका युझरने प्रतिक्रिया देताना, “तुकाराम मुंढे यांच्या शांत, गंभीर आणि संयमी शैलीसाठी उत्तम अभिनेता हवा. यासाठी के.के. मेनन योग्य आहेत,” असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तर “तुकाराम मुंढे यांची भूमिका के.के. मेनन यांच्यासाठीच बनलेली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय कुमारचाही पर्याय चर्चेत
दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार याचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बायोपिकसाठी के.के. मेनन आणि अक्षय कुमार यांच्यातील तुलना केली जात आहे.
सोशल मीडियावरील चर्चांमध्ये दोघांपैकी कोण तुकाराम मुंढे यांची भूमिका अधिक प्रभावीपणे साकारू शकेल, यावर नेटकरी आपापली मते मांडत आहेत. काही ऑनलाइन सर्वेक्षणांमध्ये के.के. मेनन यांच्या बाजूने अधिक पसंती दिसून आल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर अधिकृत बायोपिक किंवा या भूमिकेसाठी कोणत्याही अभिनेत्याची अधिकृत निवड झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
FDAच्या कारवायांमुळे पुन्हा चर्चेत
दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अलीकडे केलेल्या काही कारवायांमुळे तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विभागाकडून खाद्यपदार्थ, औषधे आणि जाहिरातींशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे.
बॉलिवूड कलाकार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना एका जाहिरातीच्या संदर्भात FDAकडून नोटीस बजावण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीची सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
आता त्यांच्या आयुष्यावर खरंच बायोपिक तयार होणार का आणि झाला तर तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेत के.के. मेनन दिसणार की अक्षय कुमार? हा प्रश्न मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
तुकाराम मुंढेंच्या बायोपिकमध्ये कोण साकारणार भूमिका? के.के. मेनन की अक्षय कुमार
|