राजकीय

उचगावमध्ये पोलीस चौकीची शिवसेनेकडून मागणी

uchgaon police chowki demand kolhapur shivsena nivedan


By nisha patil - 6/8/2026 3:10:46 PM
Share This News:



उचगावमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकीची मागणी; शिवसेना ठाकरे गटाचे एसपींना निवेदन

कोल्हापूर :

शहरालगत असलेल्या उचगाव परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचगावमध्ये स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख समन्वयक विक्रम शालन बाबासो चौगुले (बापू) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, उचगाव गावाची लोकसंख्या 60 ते 70 हजारांहून अधिक असून परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार व कष्टकरी वर्ग वास्तव्यास आहे. उचगावसह गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असून, नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी चोरी, मारामारी यांसारखे प्रकार घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या गांधीनगर पोलीस ठाणे उचगावपासून दूर असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे उचगावमध्ये पोलीस चौकी झाल्यास उचगाव, मुडशिंगी, सरनोबतवाडी आणि आसपासच्या परिसरात पोलिसांना तत्काळ कारवाई करणे शक्य होईल, असे निवेदनात म्हटले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी उचगावमध्ये लवकरात लवकर पोलीस चौकी मंजूर करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.


Uchgaon Police Chowki Kolhapur
Total Views: 18