बातम्या
रानडुक्कराच्या शिकारीच्या उद्देशाने गेलेल्या दोघांना वनकोठडी
By nisha patil - 5/31/2025 6:24:23 PM
Share This News:
पन्हाळा : पन्हाळा वनपरिक्षेत्रातील मौजे केखले येथे रानडुक्कराच्या शिकारीसाठी गेलेल्या दोघा संशयितांना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने एक दिवसाच्या वनकोठडीची शिक्षा सुनावली आहे.
दिनांक २८ मे २०२५ रोजी मौजे केखले येथे रानडुक्कराच्या शिकारीसाठी काही लोक गेल्याची गोपनीय माहिती पन्हाळा वनविभागाला मिळाली. त्यानुसार परिक्षेत्र वनअधिकारी अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली RRT पथकासह घटनास्थळी धाव घेण्यात आली. या दरम्यान ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध घेतला असता, अशोक भिमराव जाधव हे संशयित पळताना आढळून आले.
याप्रकरणी भारतीय वन्यजीव (संवर्धन) अधिनियम १९७२ चे कलम ९, ५०, ५१, २ (१६) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, अशोक जाधव (रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा) आणि बंडा पोपट चौगले (रा. माले, ता. पन्हाळा) या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पन्हाळा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एका दिवसाच्या वनकोठडीची शिक्षा सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्पा) कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वनपाल सागर पटकारे, वनरक्षक योगेश पाटील, पाटील (पन्हाळा), बाजीराव देसाई (कोतोली) आणि RRT कोल्हापूर पथक सहभागी होते.
रानडुक्कराच्या शिकारीच्या उद्देशाने गेलेल्या दोघांना वनकोठडी
|