बातम्या

सेवेचा सन्मान; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते वर्षा नगरच्या गणरायाची आरती

varsha nagar ganpati aarti by kolhapur municipal health workers


By Shivani - 9/21/2026 5:41:04 PM
Share This News:



सेवेचा सन्मान; कोल्हापूर महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते वर्षा नगरच्या गणरायाची आरती


कोल्हापूर :

शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा यंदाच्या गणेशोत्सवात अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला. वर्षा नगर मित्र मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते इस्माईल बागवान यांच्या संयुक्त पुढाकाराने वर्षा नगर मित्र मंडळाच्या श्री गणरायाची आरती महापालिका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या उत्साहात आयोजित करण्यात आलेल्या या आरती सोहळ्याला महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कौसर इस्माईल बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी गणरायाची मनोभावे आरती केली.

शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेचे सफाई कर्मचारी, आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी नियमितपणे कार्यरत असतात. सण-उत्सवांच्या काळातही स्वच्छता राखण्याची मोठी जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असते. त्यांच्या या योगदानाची दखल घेत वर्षा नगर मित्र मंडळाच्या वतीने गणरायाच्या आरतीचा मान देत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

‘सेवेचा सन्मान’ या भावनेतून आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवातील सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेला मानाचा मुजरा करत त्यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी गणरायाचे दर्शन घेत आरोग्य कर्मचारी आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या आरती सोहळ्याने वर्षा नगर परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह अधिक वाढला.

 


सेवेचा सन्मान; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते वर्षा नगरच्या गणरायाची आरती
Total Views: 15