ताज्या बातम्या
वीर शिवा काशीद पुण्यतिथी शासकीय कार्यालयांत साजरी करण्याची मागणी; आजरा नाभिक समाजाचे निवेदन
By Shivani - 10/7/2026 5:41:59 PM
Share This News:
वीर शिवा काशीद पुण्यतिथी शासकीय कार्यालयांत साजरी करा; आजरा तालुका नाभिक समाजाची मागणी
आजरा | हसन तकीलदार :
वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त 13 जुलै रोजी राज्यातील शासकीय कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकृतरीत्या पुण्यतिथी साजरी करण्यात यावी, अशी मागणी आजरा तालुका नाभिक समाज संघटनेने केली आहे. यासंदर्भात विविध शासकीय अधिकाऱ्यांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील वीर शिवा काशीद यांच्या अतुलनीय बलिदानाचा उल्लेख करण्यात आला आहे. पन्हाळगडाला सिद्दी जोहरने वेढा दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नेबापूर (ता. पन्हाळा) येथील शिवा काशीद यांनी स्वतः महाराजांचे रूप धारण करून शत्रूसमोर जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या मृत्यूची पूर्ण जाणीव असूनही त्यांनी स्वराज्य आणि शिवरायांसाठी बलिदान दिले. त्यांच्या या शौर्याची आठवण म्हणून दरवर्षी 13 जुलै रोजी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.
नाभिक समाज संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीर मावळ्याचे स्मरण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे. विशेषतः शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करून नव्या पिढीला त्यांच्या त्यागाची आणि देशभक्तीची प्रेरणा मिळावी.
हे निवेदन आजरा तहसीलदार, आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच मुंबई सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष यांना देण्यात आले.
यावेळी आजरा तालुका नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष आकाश नंदकुमार शिंदे, उपाध्यक्ष गौतम बाबुराव भोसले, निलेश साळोखे, माजी उपाध्यक्ष देव पाचवडेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Veer Shiva Kashid Punyatithi
|