शैक्षणिक
डिजिटल युगातही डॉ. रंगनाथन यांचे विचार मोलाचे; प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे
By Shivani - 12/8/2026 5:34:46 PM
Share This News:
डिजिटल युगात डॉ. रंगनाथन यांचे विचार मोलाचे; प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन आणि ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन
कोल्हापूर :
ई-पुस्तके, डिजिटल ग्रंथालये, ऑनलाइन डेटाबेस, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे विचार अत्यंत मोलाचे आहेत. त्यांच्या योगदानामुळे ग्रंथालयांना शास्त्रीय आणि सुसूत्र स्वरूप प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनी नेहमी वाचनाची सवय जोपासावी. समृद्ध जीवन जगण्याचा वाचन हा राजमार्ग असून, विद्यार्थ्यांची पावले नेहमी ग्रंथालयाकडे वळली पाहिजेत, असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले.
डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद कॉलेजच्या ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी डिजिटल युगातही ग्रंथालय आणि वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
दरम्यान, दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथालयांचा प्रभावी वापर’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. युनिक ॲकॅडेमी, पुणेचे सदस्य कैलास भालेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ग्रंथालयातील उपलब्ध संदर्भग्रंथ, नियतकालिके आणि डिजिटल साधनांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत त्यांनी माहिती दिली.
या ऑनलाइन व्याख्यानाचे संयोजन युनिक ॲकॅडेमी, पुणेचे चंद्रकांत खरात, करिअर कौन्सिलिंग सेलच्या प्रमुख डॉ. राजश्री पाटील आणि ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृणालिनी देसाई आणि डॉ. केतकी पाटील यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनाच्या आयोजनासाठी बी. ए. नारे, सौ. प्रियांका बिडकर, बी. एस. खोत, मंगल गुरव, प्रतिक पानारी आणि सुरेश इंगळे यांनी परिश्रम घेतले.
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन जयंती उत्साहात; ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
|