शैक्षणिक
कोल्हापुरात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विवेकानंद कॉलेजच्या एनसीसी छात्रांची सायकल रॅली
By Administrator - 10/31/2026 5:41:58 PM
Share This News:
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विवेकानंद कॉलेजच्या एनसीसी छात्रांची भव्य सायकल रॅली
कोल्हापूर :
भारताचे लोहपुरुष आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजच्या एनसीसी विभागामार्फत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून दसरा चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली.
स्वातंत्र्यानंतर देशातील ५६५ संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताची निर्मिती करण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये एनसीसीच्या छात्रांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जात, पंथ, धर्म, भाषा, वर्ग आणि वंश यांमधील विविधता जपत राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीचा संदेश यावेळी देण्यात आला. विविधतेतून एकता हीच भारताची खरी ताकद असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, कर्नल मानस दीक्षित, कर्नल विक्रम नलवडे, प्रा. शिल्पा भोसले आणि कार्यालयीन प्रबंधक सचिन धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले. लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा आणि सीटीओ प्रा. डॉ. नम्रता नरेवाडीकर यांनी रॅलीचे यशस्वी नियोजन व संयोजन केले.
या उपक्रमाला एनसीसीच्या मोठ्या संख्येने छात्रांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्याबरोबरच तरुणांमध्ये देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा संदेश या सायकल रॅलीतून देण्यात आला.
कोल्हापुरात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विवेकानंद कॉलेजच्या एनसीसी छात्रांची सायकल रॅली
|