शैक्षणिक

यश फाउंडेशनकडून पेरणोली केंद्र शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

yash foundation educational material distribution pernoli ajra


By nisha patil - 1/7/2026 12:08:02 PM
Share This News:



आजरा (हसन तकीलदार) :

 पेरणोली (ता. आजरा) येथील केंद्र शाळेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम कु. यश संतोष जाधव यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश जोशीलकर होते.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, रविंद्र देसाई, ग्रामपंचायत सदस्य रणजित फगरे, उद्योजक संजय दळवी, एकनाथ जोशीलकर आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात यश फाउंडेशनचे संस्थापक संतोष जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाजातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी तसेच सामाजिक सेवेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा या उद्देशाने यश फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दिलेले शैक्षणिक साहित्य हे केवळ मदतीचे साधन नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यातील एक छोटीशी गुंतवणूक आहे.”

ते पुढे म्हणाले की, समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने अशा सेवाभावी उपक्रमात सहभागी होऊन शिक्षणाचा दीप प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा. यश फाउंडेशन भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गीता नाईक यांनीही मनोगत व्यक्त करताना, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

यश फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात सातत्याने राबविलेल्या उपक्रमांचे यावेळी उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमात शिक्षक धनाजी रावण यांची केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक एकनाथ पाटील, नामदेव सावंत, सोपान फगरे, राजेंद्र कळेकर, भाऊ भोकरे, हर्षद लोंढे, काकासो सुतार, संतोष सावंत यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यश फाउंडेशनकडून पेरणोलीत शैक्षणिक साहित्य वाटप
Total Views: 81