राजकीय
आयुष औषध उत्पादकांना दिलासा! GMP नियमांबाबत मंत्री योगेश कदम यांची सकारात्मक भूमिका
By Shivani - 12/8/2026 2:09:16 PM
Share This News:
लघु आयुष औषध उत्पादकांच्या अडचणींवर मंत्री योगेश कदम यांची सकारात्मक भूमिका
मुंबई । प्रतिनिधी : चंद्रकांत कुंभार -
महाराष्ट्रातील आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी आणि सिद्ध औषध उत्पादक लघु व मध्यम उद्योगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर अन्न व औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आयुष स्मॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) मुंबई मंत्रालयात मंत्री कदम यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन साद केले.
GSR 657(E) अधिसूचना आणि Schedule T मधील नव्या GMP निकषांमुळे लघु उत्पादकांवर येणारा अतिरिक्त आर्थिक व प्रशासकीय भार लक्षात घेऊन या नियमांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
लघु आयुष उत्पादकांच्या प्रमुख मागण्या
असोसिएशनच्या निवेदनामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या :
1. GSR 657(E) अधिसूचनेतील जाचक अटींच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देऊन लघु उत्पादकांच्या प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा करावी.
2. Schedule T मधील नवीन GMP निकष लागू करण्यासाठी लघु उद्योगांना पुरेसा संक्रमण कालावधी (Grace Period) देण्यात यावा.
3. उत्पादनांच्या Stability Study संदर्भातील नियमांमध्ये लघु उत्पादकांसाठी व्यवहार्य व सुलभ तरतुदी कराव्यात.
4. राज्य FDA कडून मंजूर होणाऱ्या उत्पादनांची नोंदणी e-Aushadhi पोर्टलवर Auto Migration पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
5. QR Code, GTIN, Barcode व नवीन Product Code प्रणाली लघु उद्योगांना सक्तीची करू नये अथवा त्यासाठी सुलभ व टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी.
6. Risk Based Inspection, QA/QC, Microbiology Laboratory, Validation, HEPA Filter, Air Handling System इत्यादी सुविधा उद्योगाच्या उत्पादन क्षमतेनुसार व जोखमीच्या स्वरूपानुसार लागू कराव्यात.
7. लघु उत्पादकांना आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासकीय अनुदान व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे.
8. आयुर्वेदातील ग्रंथोक्त उत्पादनांच्या पारंपरिक पद्धतींचा विचार न करता प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र तांत्रिक मनुष्यबळ व स्वतंत्र सुविधा अनिवार्य करण्याऐवजी लघु उद्योगांसाठी स्वतंत्र व व्यवहार्य धोरण तयार करावे.
9. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान उत्पादन परवाना व तपासणी व्यवस्था सक्षम ठेवून, नव्या प्रणाली लागू करताना लघु उत्पादकांना अनावश्यक अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
10. उत्पादनांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी प्रत्येक शहरात उपलब्ध असलेल्या विज्ञान शाखेची महाविद्यालये, D. Pharmacy/B. Pharmacy महाविद्यालये, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तसेच मान्यताप्राप्त शासकीय व खाजगी प्रयोगशाळांना आवश्यक निकषांनुसार चाचणी करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.
11. प्रस्तावित AYUSH e-Portal संदर्भात लघु उत्पादकांच्या अडचणी व व्यवहार्य पर्यायांचा विचार होईपर्यंत त्याची अंमलबजावणी स्थगित ठेवावी किंवा संक्रमण कालावधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
नियमांमुळे लघु उद्योगांवर आर्थिक भार
आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि सिद्ध या पारंपरिक उपचार पद्धतींचा मोठा वारसा असून अनेक लघु उत्पादक पारंपरिक पद्धती आणि ग्रंथोक्त संदर्भांनुसार औषधनिर्मिती करत आहेत. मोठ्या फार्मास्युटिकल उद्योगांच्या धर्तीवर सर्व नियम आणि पायाभूत सुविधा एकाच वेळी लघु उत्पादकांवर लागू केल्यास त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडू शकतो, अशी चिंता असोसिएशनने व्यक्त केली.
गुणवत्ता आणि ग्राहकांची सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड न करता लघु उद्योगांची आर्थिक व तांत्रिक क्षमता लक्षात घेऊन नियमांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, अशी भूमिका असोसिएशनने मांडली.
लवकरच संबंधित विभागासोबत बैठक
निवेदनाची दखल घेत मंत्री योगेश कदम यांनी लघु आयुष उत्पादकांच्या समस्या समजून घेतल्या. संबंधित विभाग आणि असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत लवकरच बैठक घेऊन प्रश्नांवर योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
लघु उद्योजकांवर अनावश्यक आर्थिक व प्रशासकीय भार पडू नये, त्यांचे उद्योग टिकून राहावेत आणि त्याचवेळी औषधांची गुणवत्ता व ग्राहकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी योग्य समतोल साधण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
या सकारात्मक भूमिकेबद्दल आयुष स्मॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने मंत्री योगेश कदम यांचे आभार मानण्यात आले.
शिष्टमंडळात राज्यातील उत्पादकांचा सहभाग
या शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष दीपक महाजन, सुवर्णवेद फार्माचे शिवानंद कुंभार, संपूर्ण जीवनचे बाळासाहेब पाटील, कृपा औषधालयचे राजन दळी, LK Pharma चे मालशे, श्रीकृष्ण औषधालयचे अशोक अभ्यंकर, सिंधुदुर्गचे नानोसकर, वैदेही, Shitvalkal Pharma चे अतुल खोत, रायगडचे वैद्य, अलिबागचे डॉ. सुहास म्हात्रे, Kokan Pharmaceuticalsचे प्रसाद सोमकांत नानोसकर, सोमकांत शांताराम नानोसकर, कोल्हापूर येथील Snehakavachचे चंद्रकांत कुंभार तसेच असोसिएशनचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
लघु आयुष औषध उत्पादकांच्या अडचणींवर मंत्री योगेश कदम यांची सकारात्मक भूमिका
|