गोकुळ दूध विक्रीत मोठी वाढ; ४० दिवसांत दीड लाख लिटरची वाढ, ग्राहकांचा विश्वास कायम
By Shivani - 7/13/2026 5:33:20 PM
Share This News:
‘गोकुळ’च्या दूधाला ग्राहकांची पसंती; ४० दिवसांत विक्रीत दीड लाख लिटरची वाढ
गुणवत्ता, शुद्धता आणि विश्वासाच्या जोरावर गोकुळची बाजारपेठेत मजबूत पकड
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे गोकुळच्या दूध विक्रीत गेल्या ४० दिवसांत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ झाली आहे.
सध्या गोकुळकडून पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली तसेच कोकण विभागात दररोज सुमारे १६ ते १६.५० लाख लिटर दूध विक्री केली जात आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे गोकुळच्या विक्रीत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.
‘गुणवत्ता म्हणजेच गोकुळ’ ही ओळख ग्राहकांच्या मनात निर्माण झाली असून, दूध संकलनापासून प्रक्रिया, पॅकिंग आणि वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गोकुळचे दूध तसेच तूप, लोणी, पनीर, दही, ताक, श्रीखंड, चीज, बासुंदी, गुलाबजाम आणि आईस्क्रीम यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांनाही बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील म्हणाले, “गुणवत्ता हीच गोकुळची सर्वात मोठी ताकद आहे. ग्राहकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ योग्य दरात उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. दूध उत्पादकांनी विश्वासाने दिलेल्या दर्जेदार दुधावर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता कायम ठेवली जाते. त्यामुळे ग्राहकांचा गोकुळवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.”
दूध उत्पादक, कर्मचारी, वितरक, केंद्र चालक, वाहतूकदार आणि हितचिंतकांचे सहकार्य तसेच ग्राहकांची पसंती यामुळे गोकुळच्या विक्रीत वाढ होत आहे. भविष्यातही गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता अधिकाधिक ग्राहकांपर्यंत गोकुळची उत्पादने पोहोचविण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे.
|