छोट्या कामांसाठी नागरिकांना त्रास होऊ नये – मंत्री हसन मुश्रीफ
By nisha patil - 4/27/2026 4:48:19 PM
Share This News:
सेनापती कापशी (ता. कागल, दि. २७) : नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी शासनाच्या योजना सुलभ आणि प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाशिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
मुश्रीफ यांनी सांगितले की, रेशन कार्ड, सातबारा, वारसा नोंदणी, मोफत धान्य, जमिनीची मोजणी अशा कामांमध्ये नागरिकांना अडचणी येऊ नयेत. शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत सहज पोहोचल्या पाहिजेत. संजय गांधी निराधार, विधवा, दिव्यांग, बांधकाम कामगार योजना, पीएम सूर्यघर, बळीराजा पानंद रस्ते यांसारख्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी संजयबाबा घाटगे यांनीही शासनाच्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून नागरिकांना न्याय मिळावा, असे सांगितले.
कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पाताई शशिकांत खोत, सभापती सुवर्णा पाटील, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांना विविध दाखले व योजनांच्या मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले.
|