बातम्या

निसर्गाबरोबरच कौटुंबिक पर्यावरण टिकवण्यासाठी एका ध्येयवेड्याची धडपड*

Environment 1


By nisha patil - 11/7/2026 2:45:29 PM
Share This News:



**निसर्गाबरोबरच कौटुंबिक पर्यावरण टिकवण्यासाठी एका ध्येयवेड्याची धडपड*

**पर्यावरणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जी. एम. पाटील यांचा "सकाळ गौरवगाथा 2026"मध्ये कार्याचा गौरव*

*आजरा(हसन तकीलदार)*:-समाजसेवा, आरोग्यसेवा तसेच पर्यावरण रक्षण यासारख्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव सोहळा डॉ. दिलीप माने (आरोग्य उपससंचालक, कोल्हापूर ), संजीव भोर (प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर), नम्रता गायकवाड(अभिनेत्री) व निखिल पंडितराव(संपादक सकाळ) यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे नुकताच पार पडला. या गौरव सोहळ्यामध्ये निसर्गासोबतच कौटुंबिक पर्यावरण टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंजिनियर जी. एम. पाटील (जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद, मुंबई )यांचा गौरव करण्यात आला.

      सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक व अन्य विविध अंगानी राजकारण केले जाते परंतु जी. एम. पाटील यांनी पर्यावरणीय अंगानेही राजकारण करता येते हे सिद्ध करून दाखवले. नवीन वृक्षारोपण करण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या आहे त्याच जंगलाचे संरक्षण व संवर्धन करणे महत्वाचे आहे असा संदेश देत "वणवामुक्त जंगल "चा संकल्प त्यांनी अंगीकारून जंगल संपदा वाचवण्यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून निसर्ग व पर्यावरण प्रेमी तयार झाले आहेत. त्यामुळे पेटणारे जंगल वाचवणे हे प्रत्येकजण आपले आद्यकर्तव्य मानत आहेत. प्रतिवर्षी जिल्ह्यात अंदाजे 1000 ते 1500 हेक्टर इतके जंगल क्षेत्र वणव्यात जळून जात होते. जी. एम. पाटील यांच्या लोकचळवळीतून लोकजागृती होऊन त्यामध्ये कितीतरी पटीने कमालीची घट झाली आहे. शून्य जळीत क्षेत्र व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र च्या माध्यमातून त्यांनी जनजागृती सुरु ठेवली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वनसंपदा अबाधित राहील अशी अशा ते बाळगून आहेत.जी. एम.पाटील हे 2021-22 या सालापासून वणवा प्रतिबंधक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. वनविभागाच्या मदतीने त्यांनी तालुक्यात जंगलांना लागणारे वणवे रोखण्यास सुरवात केली. मोबाईल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना जंगलाला आग लागली आहे असे कळाले तरी ते स्वतः घटनास्थळी धावून जातात. कोणताही विचार न करता आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. झाडे, वेली, पक्षी, वन्यप्राणी, कीटक, सूक्ष्मजीव, जंतू यांना जीवदान देण्याची धडपड सुरु आहे. आता त्यांची ही धडपड लोकचळवळ बनली आहे.

   आज तापमान वाढ अतिवृष्टी, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ, त्सुनामी, अनियमित पाऊस यासारख्या वैश्विक संकटांचा सामना करावा लागत आहे. याबाबत समाजात जागृती करून जंगलांचे संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्याचे काम इंजिनियर जी. एम. पाटील हे अतिशय प्रामाणिकपणे व सचोटीने करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत कोल्हापूर येथे" सकाळ गौरव गाथा 2026"या गौरव सोहळ्यात "जंगल दूत"म्हणून त्यांचा सत्कार झाला.

 

   निसर्गाबरोबरच कौटुंबिक पर्यावरणही टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. सद्याच्या डिजिटल युगात माणूस कुटुंबापासून दूर होत चालला आहे. मोबाईल जगाला जोडत असताना, जग जवळ येत असतानासुद्धा मोबाईलमुळे माणसाची कुटुंब व्यवस्था दूर होऊन ओस पडत चालली आहे. कृषी संस्कृतीही लोप पावत चालली आहे. नाती गोतींचा विसर पडत चालला आहे. एकाच घरात नात्यांची वीण सैल होत चालली आहे. अशा काळात "एक कुळ एक गणपती "चा नारा देत त्यांनी आपल्या कुळाचा एक गणपती बसवत बाप्पांच्या कृपेखाली सर्व कुळाला एकत्र आणले आणि भारतीय संस्कृती बरोबच कौटुंबिक पर्यावरणही टिकवण्यासाठी धडपड सुरु केली आहे. त्यांच्या या अलौकिक कार्याचा यथोचित सत्कार झाला आहे.


निसर्गाबरोबरच कौटुंबिक पर्यावरण टिकवण्यासाठी एका ध्येयवेड्याची धडपड*
Total Views: 7