बातम्या
देवगड अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनावर दाखल गुन्ह्यांचा महिला काँग्रेसकडून निषेध
By nisha patil - 10/7/2026 6:33:05 AM
Share This News:
देवगड अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनावर दाखल गुन्ह्यांचा महिला काँग्रेसकडून निषेध
सिंधुदुर्ग :शुभम गवस देवगड अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या घटनेचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. लोकशाहीमध्ये नागरिकांना आपले मत मांडण्याचा व शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असून, अशा आंदोलनांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
भारतीय संविधानाच्या कलम 19(1)(अ) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि कलम 19(1)(ब) अंतर्गत शांततेने व नि:शस्त्रपणे एकत्र येण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला प्रदान करण्यात आला आहे. देवगड अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांनी पर्यावरण, मत्स्यव्यवसाय, शेती आणि पर्यटन क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणामांविषयी चिंता व्यक्त करत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले होते. त्यानंतर २५ नागरिकांवर गुन्हे दाखल झाल्याची बाब अत्यंत गंभीर असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, असे वंजारी यांनी म्हटले आहे.
देवगड येथे प्रस्तावित जलसमाधी आंदोलनाला प्रांताध्यक्ष देवगड यांच्या विनंतीनुसार स्थगिती देण्यात आली होती. सर्व प्रमुख नेते व नागरिकांनी संयमाची भूमिका घेतली असतानाही काही ठराविक आंबा बागायतदार पाण्यात उतरले. त्यानंतर २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, या कारवाईमुळे आंदोलनकर्ते घाबरणार नाहीत. कोकणच्या संरक्षणासाठी आणि स्थानिक जनतेच्या हक्कांसाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
महिला काँग्रेसने आंदोलनाशी संबंधित गुन्ह्यांचा निष्पक्ष फेरआढावा घेण्याची, स्थानिक नागरिक, तज्ज्ञ आणि प्रशासन यांच्यात खुला संवाद घडवून आणण्याची तसेच अणुऊर्जा प्रकल्पाबाबतची सर्व पर्यावरणीय, सामाजिक आणि सुरक्षाविषयक माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नसून जनतेच्या भावना आणि घटनात्मक अधिकारांचा सन्मान राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. शासनाने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता संवादाचा मार्ग स्वीकारावा, अशी ठाम भूमिका महिला काँग्रेसने मांडली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पालकमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणीही सौ. साक्षी वंजारी यांनी केली.
देवगड अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनावर दाखल गुन्ह्यांचा महिला काँग्रेसकडून निषेध
|