बातम्या

"मतदार यादीतील त्रुटींविरोधात स्वाभिमानीचा इशारा"

Swabhimani warns against errors in the voters list


By nisha patil - 10/7/2026 6:35:53 AM
Share This News:



"मतदार यादीतील त्रुटींविरोधात स्वाभिमानीचा इशारा"

पुनरीक्षण प्रक्रिया पारदर्शक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार
 

कागल प्रतिनिधी अजित बोडके कागल : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे वगळली जाणे, मृत व्यक्तींची नावे कायम राहणे, नवमतदारांचा समावेश न होणे तसेच पत्ते व इतर तपशीलांमधील त्रुटींमुळे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कागल तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन सादर केले.
 

निवेदनात मतदार यादीचे पुनरीक्षण पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि त्रुटीमुक्त पद्धतीने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गावात बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी (BLO) प्रत्यक्ष घरभेटी देऊन पडताळणी करावी, चुकीने वगळलेल्या मतदारांची नावे तातडीने समाविष्ट करावीत तसेच प्राप्त दावे व हरकतींचा त्वरित निपटारा करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
 

मतदार यादीतील प्रत्येक त्रुटी ही नागरिकांच्या घटनात्मक मतदानाच्या अधिकारावर गदा आणणारी असल्याचे नमूद करत, कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप अथवा पक्षपातीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. पुनरीक्षण प्रक्रियेत हलगर्जीपणा आढळल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाला दिला आहे.
 

यावेळी डॉ. बाळासाहेब पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष), नितेश कोगनोळे (जिल्हा सरचिटणीस), तानाजी चौगुले (उपाध्यक्ष, कागल तालुका), सातापा काशीद, समाधान तांबडे, ज्ञानदेव पाटील, संतोष खोंद्रे, युवराज खोंद्रे, आनंदा खोंद्रे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

"लोकशाहीची खरी ताकद अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादीत आहे. त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही," अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे मांडली.

 


"मतदार यादीतील त्रुटींविरोधात स्वाभिमानीचा इशारा"
Total Views: 13