बातम्या

आंबा घाटात दरड कोसळण्याचा धोका वाढला; राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेबाबत नागरिकांची चिंता

amba ghat landslide risk kolhapur ratnagiri highway safety


By Shivani - 10/7/2026 3:58:56 PM
Share This News:



कोल्हापूर | तारा न्यूज प्रतिनिधी – अजित बोडके

कोल्हापूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. घाटातील अनेक ठिकाणी माती व दगड घसरून थेट महामार्गावर येत असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या या महामार्गावरील सुरक्षाविषयक कामे रवी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत सुरू आहेत. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी ग्रीलिंग आणि संरक्षणात्मक जाळी बसविण्याचे काम सुरू असले, तरी सततच्या पावसामुळे डोंगर उतारांवरील माती आणि दगड घसरत असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर–रत्नागिरी हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. दिवस-रात्र हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करत असतात. अशा परिस्थितीत मोठी दरड कोसळून अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, आंबा घाटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रभावी आपत्कालीन मदत केंद्रे, तातडीची बचाव यंत्रणा किंवा आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था उपलब्ध नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

नागरिकांनी प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीने धोकादायक ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करून संरक्षणात्मक उपाययोजना पूर्ण कराव्यात, संवेदनशील भागांवर सतत देखरेख ठेवावी, आपत्कालीन पथके तैनात करावीत तसेच धोक्याच्या ठिकाणी इशारा फलक आणि प्रभावी वाहतूक नियंत्रण व्यवस्था उभारावी, अशी मागणी केली आहे.


Landslide Risk Increases at Amba Ghat
Total Views: 9