ग्रामीण
राजकारण बाजूला ठेवत शेतकऱ्यांच्या बांधावर बाबू गवस; हत्तीच्या हल्ल्यात नुकसानग्रस्तांना दिला मदतीचा आधार
By Shivani - 11/7/2026 3:08:22 PM
Share This News:
पक्षभेद विसरून घेतली शेतकऱ्यांची भेट; तातडीने नुकसानभरपाई देण्याची शासनाकडे मागणी
दोडामार्ग | प्रतिनिधी : शुभम गवस
राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका दोडामार्ग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी घेतली आहे. पाळये गावात हत्तीच्या हल्ल्यात शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची त्यांनी थेट त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पाळये परिसरात हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे नुकसान, आर्थिक अडचणी आणि भविष्यातील चिंतेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बाबू गवस यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
विशेष म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये विविध राजकीय पक्षांशी संबंधित कार्यकर्त्यांचाही समावेश होता. मात्र, कोणताही राजकीय भेदभाव न करता त्यांनी सर्व शेतकऱ्यांची भेट घेत मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या भूमिकेची परिसरात चर्चा होत असून, संवेदनशील नेतृत्वाचे उदाहरण म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे.
यावेळी बाबू गवस यांनी हत्तींच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी केली. "शेतकरी कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे.
Elephant Attack Sindhudurg
|