राजकीय
"सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही; टीका करणे हा लोकशाही अधिकार सतेज पाटलांचा सरकारला टोला"
By Shivani - 10/7/2026 3:12:53 PM
Share This News:
कोल्हापूर :
विरोधी पक्षाने सरकारच्या कामांवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे विकासाला विरोध नसून लोकशाहीतील जबाबदारी असल्याचे काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आ. सतेज (बंटी) पाटील यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषदेतील चर्चेदरम्यान बोलताना सतेज पाटील म्हणाले की, "एखादा प्रकल्प चांगला झाला तर सरकारने त्याचे श्रेय घ्यावे, मात्र त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे."
विरोधी पक्ष म्हणून सरकारला आरसा दाखवणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी, "आम्ही विरोधक म्हणून प्रश्न उपस्थित केले तर त्याचा अर्थ महाराष्ट्राच्या विरोधात आहोत असा होत नाही. सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही," असा टोला लगावला.
टीका करणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही – सतेज पाटील
सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवण्याच्या प्रवृत्तीवर सतेज पाटील यांनी निशाणा साधला. सत्तेत असताना विरोधकांनी चुका दाखवल्या तरी त्यांना महाराष्ट्राच्या विरोधात असल्याचे म्हटले गेले नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.
"लोकशाहीमध्ये सरकारच्या चुका दाखवणे आणि जनतेचे प्रश्न मांडणे हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावरील मत व्यक्त करणे हा नागरिकांचा अधिकार
सोशल मीडिया आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरही सतेज पाटील यांनी भूमिका मांडली. नागरिकांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
"कोणी सोशल मीडियावर सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित केले, टीका केली किंवा मत व्यक्त केले म्हणून त्याला धारेवर धरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही," असे सतेज पाटील म्हणाले.
हायकोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, केवळ घोषणा दिल्या किंवा मत व्यक्त केले म्हणून कारवाई करणे योग्य नाही. नागरिकांना बोलण्याचा, संघटना काढण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे.
सरकारने टीका स्वीकारून चुका सुधारण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.
Criticism and Freedom of expression on Social Media
|