राजकीय

शक्तिपीठ महामार्गाविरोधात 18 जुलैला 'सद्बुद्धी दिंडी'; 13 जिल्ह्यांतील शेतकरी पंढरपूरकडे

shaktipith highway protest sadbuddhi dindi pandharpur 18 july


By Shivani - 10/7/2026 6:17:27 AM
Share This News:



शक्तिपीठ महामार्गाविरोधात 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची 18 जुलै रोजी वाखरी ते पंढरपूर सद्बुद्धी दिंडीची घोषणा.

पंढरपूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला शेतकऱ्यांचा संघर्ष आता आणखी तीव्र होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी समन्वय समितीच्या वतीने 18 जुलै रोजी वाखरी ते पंढरपूर 'सद्बुद्धी दिंडी' काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग हा राज्यासाठी गरजेचा नसून व्यावहारिकदृष्ट्याही तोट्याचा आहे. या मार्गाला समांतर राष्ट्रीय महामार्ग असतानाही केवळ मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यासाठी आणि हजारो कोटी रुपयांची कामे करण्याच्या उद्देशाने सरकार हा महामार्ग शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही पुढे रेटत असल्याचा आरोप करण्यात आला.

महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असून, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची भीतीही आंदोलकांनी व्यक्त केली आहे. नुकतीच या प्रकल्पाची अधिसूचना काढण्यात आली असली, तरी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा होऊ दिली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची पूजा करण्यासाठी येत असताना त्यांना सद्बुद्धी मिळावी आणि सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी 'सद्बुद्धी दिंडी'चे आयोजन करण्यात आले आहे.

18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वाखरी येथून दिंडीला सुरुवात होणार असून ती पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. वर्ध्यापासून सिंधुदुर्गपर्यंतच्या 13 जिल्ह्यांतील शेतकरी, महामार्गग्रस्त आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते या दिंडीत सहभागी होणार आहेत.

गेल्या वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाला साकडे घातल्यानंतर सरकारला काही प्रमाणात माघार घ्यावी लागली होती. यंदाही 'सद्बुद्धी दिंडी'च्या माध्यमातून पांडुरंगाला साकडे घालून सरकारने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शक्तिपीठ महामार्गाचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.


Shaktipith Highway Protest :
Total Views: 12